समृद्ध, संपन्न, सुंदर गोवा!
गोवा… मांडवी नदीच्या तीरावरचं हे देखणं, टुमदार राज्य. गोव्याचं मूळ संस्कृत नाव म्हणजे गोमंतक. या नावाचे अनेक अर्थ असले तरी प्रमुख अर्थ म्हणजे सुपीक जमीन. स्कंद पुराणानुसार परशुरामाने पश्चिम घाटातून समुद्रात बाण मारून टी जमीन आपल्या मालकीची केली,तीच म्हणजे गोवा.
गोव्याचा इतिहास
सुरुवातीचा गोवा मौर्य सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा भाग होता. गोमंत, गोवाराष्ट्र, गोवापुरी, गोपकपुरी, गोपकपट्टण ही गोव्याची काही प्राचीन नावे. भोज, चालुक्य, राष्ट्रकूट व कदंब या राजघराण्यांनी येथे राज्य केले. कदंब राज्याचा काळ हा गोव्याचा सुवर्णकाळ मानला जातो. पोर्तुगीजांच्या काळात गोवा लिस्बन ऑफ द ईस्ट म्हणून प्रसिद्ध झाले.
मंदिरे, गोव्याचं सांस्कृतिक वैभव
गोवा म्हटलं की डोळ्यासम उभे राहतात अप्रतिम बीचेस, भव्य चर्चेस, पण याचबरोबर गोव्याचा एक समृद्ध भाग म्हणजे इथली मंदिरे. अतिशय देखणी, टुमदार अशी गोव्यातली हजारो मंदिरे आजही डौलाने उभी आहेत. दीपमाळ किंवा दीपस्तंभ हा या मंदिरांचा एक प्रमुख भाग.
गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर
तांबडी सुर्ला येथील श्री महादेव मंदिर हे गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. अतिशय सुंदर, शांत व निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे मंदिर १२ व्या शतकात यादव राजा रामचंद्राचा मंत्री हेमाद्री याने बांधले. गाभाऱ्यात शिवलिंग असून येथे मोठा नाग वास्तव्य करतो अशी दंतकथा आहे.
मंगेशी मंदिर
पणजीपासून २० किमी वर असलेलं मंगेशी मंदिर हे गोव्याचं सांस्कृतिक वैभव. शंकराचा अवतार असलेल्या भगवान मंगेशाचं हे मंदिर १६ व्या शतकात बांधलेलं आहे.
गोव्यातली इतर मंदिरे
- १२ व्या शतकातील ब्रह्मा मंदिर
- गोव्यातील सर्वात जुने मंदिर- महादेव मंदिर
- शांतादुर्गा मंदिर
- श्री नागेशी महारुद्र मंदिर
- १५ व्या शतकातलं महालक्ष्मी मंदिर
- भगवती देवी मंदिर
- नवदुर्गा मंदिर
- सप्तकोटेश्वर मंदिर
- कामाक्षी मंदिर
- मंदोदरी मंदिर
गोव्यातील नयनरम्य खेडी
गोव्यातील स्थानिक आयुष्याचे अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधायचे असतील तर इथली खेडेगावे पाहायलाच हवीत. एखाद्या खेड्यात सुबक घरात राहणे, अस्सल कोकणी जेवाचा आस्वाद घेणे, कोळी बांधवांबरोबर मासेमारीला जाणे, स्वच्छ बीचवर निवांत भटकणे यासारखा आनंद नाही. चला पाहू याल गोव्यातल्या काही खेड्यांची झलक.
अगोंडा
दक्षिण गोव्यातल्या काणाकोणा येथील अगोंडा हे लहानसं खेडं. इथल्या शुद्ध, सुंदर सागरकिनाऱ्यावर एक दुर्मिळ गोष्ट घडते. सप्टेंबर महिन्यात इथे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवं अंडी घालतात. इथूनच पिलं जन्म घेऊन समुद्रात जातात. अगोंड्याचा कोला बीच आणि सुरेखसे लगून पर्यटकांना अतिशय आवडते.
पॉईंगविनिम
गोव्यातील सर्वात स्वच्छ, शुद्ध व निरामय असेलेले हे टुमदार गाव. हेही रिडले कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे. शुद्ध, पारदर्शी पाणी, चंदेरी वाळू आणि सळसळत्या नारळ व माडांच्या झाडांचं नयनरम्य दृश्य, व परशुराम मंदिर इथे आहे.
असागाव
गोव्यातलं हे अगदी लहान पण खूप मनमोहक असं खेडं. हिरवीगार पर्वतराजी,काजूच्या बागांनी नटलेलं. झऱ्याचं पाणी आजारांवर गुणकारी आहे असं म्हणतात. पर्पल सनबर्ड, क्रिम्सन सनबर्ड, वॅगटेल, टिकेल ब्लू फ्लायकेचर, रेड व्हिस्कर्ड बुलबुल, आशियाई यलो ओरिओल अशा अत्यंत सुंदर पक्ष्याचं वास्तव्य इथे आहे. अगदी तुमच्या खोलीच्या खिडकीत व्हरांड्यात हे पक्षी येऊन बसतात.
गोव्यातली आणखी काही खेडी
याशिवायही असंख्य मनोहर गावांची रेलचेल गोव्यात आहे. ही खेडी अनुभवणं हा गोव्यातील पर्यटनाचा आगळावेगळा आविष्कार. गजबजलेल्या गोव्यापेक्षा शांत, निवांत असं हे पर्यटन देशोदेशीच्या लोकांना भुरळ घालत आहे.
- बेतूल
- बेतलबातीम
- मांडूर
- सालीगाव
- चोराओ
- सांगो्ड
- सायोलिम
- बार्देझ
- तिसवाडी
याशिवायही गोव्यात काही स्थळे आहेत जी अतिशय सुंदर आहेत मात्र सर्वसाधारण पर्यटकांना माहित नाहीत. पाहूया अशी काही ठिकाणे.
भगवान महावीर वाइल्ड लाईफ सॅंक्चुअरी
२४० स्क्वे. किमीचे गोव्यातले हे सर्वात मोठे अभयारण्य. हाईकिंग ट्रेल, पक्ष्याच्या १२० प्रजाती, स्पॉटेड डिअर, माऊस डिअर, हॉग, बारकिंग डिअर इथे आढळतात. शिवाय दूधसागर फॉल, तांबी फॉल, डेव्हिल्स कॅन्यन ही खास आकर्षणे.
पांडव केव्ह्ज
अर्वालें किंवा पांडव केव्ह्ज या ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकातल्या गुहा. पाच खोल्या व शिवलिंग असलेल्या या गुहांचा महाभारतातील पांडवांशी संबन्ध असल्याचं मानलं जातं. बुद्धिस्ट साधूंनी या गुहा बांधल्याचाही एका विचारप्रवाह आहे.
असा हा गोवा पर्यटकांना पुन्हापुन्हा साद घालत राहतो. आणि ते पुन्हापुन्हा येऊन इथलं सौंदर्य अनुभवतात. भाग्यश्री ट्रॅव्हल्सच्याही गोवा टूर्स आहेत. या परिपूर्ण टूर्स चा आनंद घ्या.
Sorry, the comment form is closed at this time.